गुरु आणि सूर्य

 गुरु आणि सूर्य


मनातले थोड शब्दांमध्ये.........

काल संध्याकाळचा प्रवास करतांना खिडकीतून सहज लक्ष समोर गेल आणि त्या मावळणाऱ्या सूर्याकडे, मी बघतच राहिले...खूप विलोभनीय दृश्य होत...बऱ्याच काळात अस सुंदर दृश्य दिसण्यात नाही आलेल्.....आणि नकळत चटकन मनातून शब्द आले "Thank you" "धन्यवाद" अगदी मनापासून. अगदी त्याच्याकडे बघत बघत मनापासून त्याचे अभार मानले. त्याला म्हणाले खूप सुंदर दिवस आयुष्यात आणलेस, खुप काही दिलेस अगदी मनासारखे आणि अजूनही देतोसच आहेस तु...


खरच, आपण एवढे busy आहोत का कि ह्या देवाच्या प्रत्येक निर्मितीचे एकदा तरी आभार मानायला वेळ नाहीय आपल्याकडे. 

तेव्हाच पटकन मला माझ्या गुरूंची आठवण झाली. खर सांगायचे तर आपण देवाला किंवा गुरूंना किंती गृहीत धरतो ना. फक्त त्यांच्याकडे मागणे, तक्रार, दुख, राग रुसवे, बस हेच बोलणे. अडचणीच्या दिवशी इतकी आठवण काढतो किंवा नको तेवढे बोलतो कि विचारायला नको. एकदातरी आनंदी असताना कधीतरी त्यांना धन्यवाद म्हंटले का हो? 

किंवा काहीच नाही तरी सहज त्यांच्याशी गप्पा मारल्यात का? 

नाही ना कारण वेळच कुठेय .... आपण खूप busy असतो ना, खरय ना!  पण ते आपल्यासाठी कधीच busy नसतात.


अगदी जेव्हा आपण देवळात किंवा मठात जातो. जाईपर्यंत मनात चालू असते...’काही वेळच मिळत नाही....कस कस आज वेळ काढलाय बाबा.....गर्दी असेल तर पटकन दर्शन कसे होईल.....दररोजची आपली धावपळ, आपल्याला व्याप काय कमी आहेत.....नुसती अगदी दमछाक होते....पण बघ आले तुझ्यासाठी. 


आणि त्यांच्या समोर आल्यावर, बरेच दिवस यायला नाही जमले बर, तुला तर सगळे माहितीच आहे पण तरी तु माझे काम नाही करत आहेस. 

इतके तुझे नाव घेते, प्रार्थना करते, मंत्र जाप केला पण व्यर्थ. माझे प्रोब्लेम्स तसेच. बघ बाबा आता तरी माझे काम कर, मी तुला आवडते ते देईन हा......चल वेळ नाहीय आता नंतर भेटू.....अस बोलून पटकन त्याच्यासमोरून पळ काढतो. 

खरच, एवढ्याशा अमिषासाठी बसलेत का हो ते....कधीतरी तुम्ही त्यांना काहीतरी दयाल याची वाट बघत. 

डोळे मिटून विचारातच गढले.....  कधीतरी आपल्या गुरूंची भेट घेतो का हो...अगदी सहज भेट... असंच सहज वाटले भेटावेसे आठवण आली. कधी कामाव्यतिरिक्त....नुसती सहवासात राहण्याची इच्छा.....त्यांची मनापासून सेवा करायची इच्छा. त्यांना काय हव नको ते पाहण्याची इच्छा. अहेतुक त्यांच्याबरोबर काढलेला वेळ. थोडासा एक क्षण विचार करा हेतूविना कधी आपण काही करतो का हो?


उलट, त्यांना भेटल्यावर ते कसे आहेत असे विचारायच्या आधीच बघा ना हा प्रोब्लेम आहे, हे प्रश्न आहेत, काही कळतच नाहीय काय कराव.....तुम्ही सांगाल ते करणार, तुम्ही सांगाल तसच करणार, तुमच्या शब्दाबाहेर नाही हा मी.....


पण प्रामाणिकपणे सांगा आपल्या गुरूने सांगितलेले आपण सर्व ऐकतो का हो? जे आपल्याला उत्तर हवे आहे ते नाही आल तर आपण पाठ फिरवल्यावर तेच करतो जे आपल्याला हवे आहे. खर आहे ना...

अगदी त्यांच्याकडे प्रश्नावली मांडून झाली कि मग शब्द येतात बघा ना,  माझ्याकडे तुम्हांला दयायला काहीच नाही. खूप अडचण चालू आहे. तुला तर सर्व माहितच आहे. कस कस भागवतोय आम्ही....


मग त्यावेळी जरा आपल्या मनात विचार नाही का हो येत......

ज्यावेळी महिन्यातून चार वेळा हॉटेलचे बिल अगदी १५००-२००० होईपर्यंत मला काही प्रोब्लेम नाही......कारण ते मी manage करू शकते....


माझ्याकडे हि महागातला फोन असलास पाहिजे नाहीतर लोक काय म्हणतील...अगदी हफ्त्यांवर घेईन मग ते घेते... कारण ते मी manage करू शकते....

खूप दिवस झालेत आम्ही सर्व बाहेर फिरायला नाही गेलोय जरा दोन दिवस कुठेतरी फिरून येऊ...तेही होत सर्व.... कारण ते मी manage करू शकते....

होम लोन....कार लोन.....आता तर फोन सुद्धा सुद्धा लोनवर असतो, हि सर्व लोन डोक्यावर असतात.... कारण ते मी manage करू शकते....नाही का...


अश्या सर्व स्थितीत त्यांना दयायला माझ्याकडे मात्र काही नाही....पण त्यांनी माझे मोठ्यातले मोठे प्रोब्लेम्स सोडवले पाहिजेत हा पण काही नाही घेता...... 


तेवढ्यातच अचानक एक आवाज आतून आला....अग थांब थांब कि ते विचार चालू आहेत....थोडा धीर धर......मी ठीक आहे ग, नको एवढे विचार.....मला काही नको तु सुखी रहा आणि खुश रहा......अग तुझ्या आनंदात माझा आनंद!!......आणि तो  आवाज होता माझ्या गुरूंचा .....


ते पुढे बोलत होते.....अग आमची एवढीच अपेक्षा असते आमच्या लेकरांकडून कि मी सांगितलेल्या मार्गावर चालून तर बघ. बघ कस वाटतेय. खर तर मी तुझा प्रारब्ध बदलू शकत नाही. आणि ते तुला भोगायचेच आहे. पण मी तुझ्याबरोबर कायम राहीन ते सहन करण्यासाठी लागणारी ताकत बनेन. मग कशाला घाबरतेस, मी तुला हरू देणार नाही. खूप ताकत आहे तुझ्यात. ती ओळख. नकळतपणे बाहेरच्या आकर्षणशी सहमत होऊन दुसऱ्यांबरोबर धाऊ नकोस मात्र. जे तुझ आहे तुला मी देणारच. गडबड नको. हा, पण एक कर जसा मी तुला देत गेलोय ना तस तुही कोणासाठी देणारा हात बन. जे तुझ्याकडे आहे ते देऊन तर बघ. किती वेगळा आनंद आहे त्यात बघ.

 

हि आताची परिस्थिती तुझ्याच काही चुकीच्या निर्णयामुळे, हलगर्जीपणामुळे, तुझ्या स्वभावामुळे, स्वार्थीपणामुळे, किंवा तुझे असणारे भोग यामुळे आहे. पण मी आहे ना तुझ्याबरोबर तु नको घाबरू. मी काही तुझा हात सोडणार नाही. पण आपल्या कर्माशी, आपल्या कार्याशी नेहमीच प्रामाणिक रहा. प्रत्येकवेळी देण्याची वृत्ती ठेव. आतूनही प्रामाणिक आणि निखळ रहा. नको इर्षा, नको हट्ट, नको मत्सर, नको राग, फक्त स्वतःमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न कर. 


आणि एक लक्षात ठेव कधी चोरी करू नकोस, फुकट काही घेऊ नकोस, कोणाला दुखवू नकोस, आणि कधी घेतलेले वाया घालवू नकोस. बघ, किती सुखी आणि आनंदी अशील तु. फक्त वर्षातून एकदा येणाऱ्या सणादिवशी नको रे आठवण काढू.....मी दररोजच तुझ्याजवळ आहे. मनातून हाक मार फक्त....!!! नको गाजावाजा, नको साग्रसंगीत, नको देखावा, नको खोटेपणा, फक्त तु माझा होऊन रहा.....बस..



तशीच मला जाग आली...आणि डोळे उघडले.....किती तो मनात गोंधळ..

किती प्रेमाचे शब्द होते ते....एवढे सगळे असूनही त्यांना काही नको आपल्याकडून. उलट मी अजून देईन तुला वेळेवर.... हेच वचन. 

पुन्हा एकदा त्या सूर्याकडून बघून मनात आले......खरच जो पूर्ण जगाचा एवढा भार न चुकता घेऊन चाललाय....अगदी माझ्या गुरूसारखा त्याला thank you बोलायला किंवा त्याचे आभार मानायला आपल्याकडे वेळ नाहीय.

कुठेतरी आपणच हरवून बसलोय का...अगदी सोपे वाटणारे रस्तेपण किती वळसा घालून कठीण करून ठेवले आहेत आपण.


माझ्या गुरूला बदल्यात काहीच नकोय फक्त निस्वार्थ भक्तीशिवाय.... प्रेमाशिवाय...


मग करायचा ना विचार....सुरु करायचा ना प्रवास त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जायचा!!!!


धन्यवाद आणि सूर्याप्रति, गुरुप्रति कृतग्नता


प्रो. सौ. वैशाली प्रभुलकर, 

टॅरो कार्ड रीडर, सायकॉलॉजीस्ट, NLP कोच, वास्तुतज्ञ, अंकशास्त्री  

Comments

Popular posts from this blog

शरद पूर्णिमा

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025