सामान्य व्यक्ती आणि शक्ती उपासक यांच्यात भेद काय ?

 सामान्य व्यक्ती आणि शक्ती उपासक यांच्यात भेद काय ? विचारसरणी मध्ये नेमका काय फरक पडतो... ? 

एक उदाहरण देतो. रामायणातील शबरीची कथा सगळ्यांना माहिती आहे. त्याचा सूक्ष्म भाग सांगतो. शबरी ही मातंग ऋषींची शिष्या. मातंग ऋषी हे देवी भगवतीचे अनन्यसाधारण भक्त. त्यांच्या इच्छेमुळे भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घेतला आणि तिचा उल्लेख मातंगी देवी असा केला जातो. राजश्यामला मातंगी ही दशमहाविद्यांच्या पैकी नववी विद्या. शबरी या मातंग ऋषींची शिष्या. तिला श्रीरामांना भेटायचे होते आणि म्हणून ती मातंगांच्या आश्रमात त्यांची वाट पहात होती ही कथा आपल्याला ज्ञात आहे. नंतर तिने रामाला उष्टी बोरे खायला दिली. तिची परम भक्ती पाहून रामाने ती खाल्ली... लक्ष्मण चिडला.. हे सगळे सगळे आपल्याला माहिती आहे. 

पण खरी कथा काय आहे ?

आमचे उदयनाथजी महाराज आणि मी एकदा चर्चा करत होतो. मी त्यांना विचारले,” महाराज मला शबरीची कथा काही केल्या पटत नाही. मातंग ऋषींची शिष्योत्तमा, इतकी थोर शक्तीउपासक आणि तिला एक वृद्ध स्त्री आणि रामाची भक्त असे दाखवले जाते. तिने रामाला उष्टी बोरे दिली.. हे पटतच नाही.”

महाराज म्हणाले,” सुजीत, शास्त्रात आपण कुणाकुणाचे उष्टे खाऊ शकतो याबद्दल स्पष्ट निर्देश आहेत. आपण आपल्या आईचे उष्टे खाऊ शकतो , पत्नीचे उष्टे खाऊ शकतो , मुलांचे उष्टे खाऊ शकतो किंवा गुरुचे उष्टे खाऊ शकतो. 

आता शबरी रामाची आई नव्हती, पत्नी नव्हती , कन्या सुद्धा नव्हती. मग रामाने तिचे उष्टे का खाल्ले ?

कारण शबरी ही मातंगी विद्येची खूप मोठी साधिका होती. तिने रामाला मातंगी साधना अर्थात श्रीविद्येची दीक्षा दिली. मातंगी साधना ही परिपूर्ण साधना आहे. ती संपूर्ण श्रीचक्राची साधना आहे. एखाद्या मानवाला पूर्णत्व प्रदान करणारी साधना आहे. 

साक्षात श्रीरामाला अर्थात विष्णूच्या अवताराला श्रीविद्या दीक्षा एक स्त्री देते आहे त्यावरून तिचा अधिकार , तिचे ज्ञान , तिचा दर्जा याची आपण कल्पना करू शकतो. 

आपल्याकडे स्त्रियांना हीन लेखले जात होते हा पुरोगामी दृष्टीकोन आहे. शबरी श्रीरामाला श्रीविद्या दीक्षा देते. ती रामाची गुरु आहे आणि म्हणून तिने प्रेमाने दिलेली उष्टी बोरे राम खातो. गुरूने दिलेला प्रसाद म्हणून राम त्याला भक्षण करतो आहे एका वृद्ध आणि आपली भक्त असलेल्या स्त्रीच्या भावनांचा आदर म्हणून तो ते उष्टे खात नाही. 

हे आपण समजून घेतले पाहिजे.”

शक्ती उपासना अशी गुह्यतम आहे. यातील विधी , विधान , उपासना , परंपरा सगळ्यांच्या मागे सखोल मानसशास्त्रीय चिंतन आहे. हे प्रत्येक सामान्य माणसाला उमगेल असे जरुरी नाही. मग लोकांना समजेल, पटेल , रुचेल अश्या पद्धतीने त्याला शर्करावगुंठीत करून मांडले गेले आहे. 

कोणत्याही उपासना मार्गावरील जे सिद्ध पुरुष असतात ते हे गुह्य तत्व जाणून असतात. सामान्य लोक त्यांच्या उपास्य देवाच्या आंधळ्या प्रीतीने बद्ध असतात ते त्यांना आकलन होईल असा अर्थ काढून मोकळे होतात. 

आणि आजकालच्या सर्वसमावेशकता नावाच्या ब्रिटिशांनी आणलेल्या संकल्पनेला रुचेल पचेल असे काही सांगितले गेले की त्याचाच प्रचार , प्रसार होतो.. 

त्यामुळे शबरी म्हणजे रामाची भक्त , भिल्लीण ( तिला लोकांनी भिल्लीण पण करून टाकले ) आणि राम तिची उष्टी बोरे खातो , म्हणजे राम किती सर्वसमावेशक... !!!

पण हे सकारात्मक भासणारे असले तरी narrative च आहे आणि यात सत्याचा अपलाप केला आहे. 

©सुजीत भोगले.

Comments

Popular posts from this blog

शरद पूर्णिमा

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025