देव/देवतांची गरज का आहे?
“देव जर तटस्थ आहे आणि तो नियतीच्या योजनेत ढवळाढवळ करत नाही. तर मग देव/देवतांची गरज का आहे?”
या प्रश्नावर बराच उहापोह केल्यावर, अभ्यासाअंती मला (माझ्यापुरतं) याचं उत्तर मिळाले. ते मी फक्त इथे शेअर करतो, त्यामुळे तुमचं समाधान होईल किंवा व्हायला पाहिजे असा अजिबात आग्रह नाही बरं.... देव हा माझ्यामते जर पंच (अंपायर) आहे तसाच तो मदतनीसही आहे, मार्गदर्शकही आहे आणि तो घर्षण कमी करणाऱ्या इंजिन ऑईल, ल्युब्रिकंट सारखाही आहे. तो इंजिन कुलंटचंही कधीतरी काम करतो. तो नियतीच्या कार्मिक अकाऊंटमधे ढवळाढवळ किंवा हॅकिंग न करता तुमचे हालअपेष्टा, कष्ट कमी करुन तुमचे नकारात्मक भोग सुसह्य करतो. हे मात्र माझ्यासकट असंख्य लोकांनी अनुभवलेले आहे.
देवाची उपासना, स्तोत्रवाचन, पूजाअर्चा किंवा होमहवन यांनी आपल्या स्वभावातील सकारात्मकता आणि आत्मबल वाढायला मदत होते हे १००%, दैनंदिन उपासनेमुळे तुमच्या सभोवार एक विशिष्ट वलय निर्माण होते, कवच किंवा चिलखत असावे तसे ते वलय तुमचे संरक्षण करते. म्हणजे एखादा फटका/धक्का बसणं हेच जर विधिलिखित आहे तर देवाची उपासना तो धक्का न थांबवता तुमच्याभोवती संरक्षकयंत्रणा उभी करते याचा रोकडा अनुभव अनेकदा येतो....
देवासाठी केले जाणारे उपवास तुमची देहशुध्दी करुन तुमचं तपोबल वाढवतात. देहशुध्दी झाली की तुमचं मनही खंबीर होते, शरीरातील सर्व अवयव आणि ग्रंथी यांचे कार्य सुधारायला मदत होते. तुमच्या फीटनेस किंवा तंदुरुस्तीचे रहस्य उपवासात दडलेले आहे असं आज शरीरशास्त्र आणि आहारशास्त्रही मान्य करते. त्याला दैवी उपासनेची जोड दिली की तो धार्मिक उपवास समजला जातो. सर्व धर्मात उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
देव घर्षण कमी करणाऱ्या ल्युब्रिकंटचं कामही करतो. एखादं ठराविक स्तोत्र किंवा मंत्रपठण रेग्युलरली केलं की आयुष्यातला संघर्ष काही कमी होतो असं वरवर दिसत नाही पण...त्या संघर्षाचा जो त्रास आधी व्हायचा तो शुन्यावर येतो हे लक्षात येईल. व्यंकटेश स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि विष्णुसहस्त्रनामासारखी असंख्य स्तोत्रे इंजिन कुलंटचंही काम करुन तुमच्या आयुष्यातील त्रिविध ताप (आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक) तुमच्यापर्यंत आले तरी तुमचं मन आणि बुद्धी शांत ठेवतात.... त्यामुळे देव, देवाची उपासना आणि साधना हवीच...
देव ही आपली मानसिक गरज आहे. तो नेहमी आपल्या पाठीशी उभा आहे ही भावनाच किती सुंदर आणि सकारात्मक आहे. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही न चुकता अत्यंत निष्ठेने, मन लावून आणि शिस्तीने उपासना केली की ते दैवत त्याच्या संपूर्ण शक्तिनिशी तुमच्या पाठीशी “त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव” सारखं खंबीरपणे उभं रहातंच यावर विश्वास ठेवा.
✍🏻 सचिन मधुकर परांजपे (पालघर)
WARM WISHES FROM,
ANTARANG HEALING STUDIO
Comments
Post a Comment